१७ ऑक्टोबर, २०१२

शक्तिरुपेण संस्थिता।




                                  
     घट स्थापून जेव्हा जेव्हा पहिली माळ ओवली जाते, तेव्हा तेव्हा माझ्या मनात अभिमान दाटून येतो ...एक स्त्री असण्याचा.....नव्हे नव्हे ....एक लढवय्यी स्त्री असण्याचा! आणि हो स्त्रीच्या शूर आणि पराक्रमी प्रतिमेचे पूजन करणाऱ्या आपल्या संस्कृतीचाही .....
             वेद-पुराणांत  देवीची कितीतरी रूपे वर्णिली आहेत. प्रेमळ, यशदायिनी, बुद्धीदात्री परंतु हे नऊ दिवस आपण पूजा करतो ती रणरागिणीरुपी महिषासूरमर्दीनीची.
          प्रेम,माया, त्याग , स्वार्थ, अहंकार, मत्सर....कितीतरी छटा आहेत स्त्रीरूपाला. बऱ्या-वाईट दोन्हीही. परंतु , या सगळ्यात एक गोष्ट मात्र समान आहे. कोणतीही स्त्री मग ती कशीही असो , अंततः आहे लढवय्यी...रणांगणात उभारून संकटांचा धैर्याने संहार करणारी....परिस्थितीला हार न मानणारी....

             रावणाने शिव शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आत्मलिंग आणि त्रिलोकात सुंदर स्त्री वरदानरुपात मागितली. आता त्रिलोकात सुंदर स्त्री देवी पार्वतीशिवाय कोण? भोळ्यासांब महादेवांनी आनंदाने पार्वतीला वरदान म्हणून देवून टाकले. रावण पार्वती  मातेला घेवून निघाला. तेव्हा हतबल होवून देवीने श्री विष्णूंचा धावा केलाआणि  विष्णूंनी वृद्ध व्यक्तीचे रूप घेऊन मातेची हुशारीने सुटका केली.
            
                           जेव्हा दैत्य महिषासुराच्या त्रासाने सारी सृष्टी त्रस्त झाली आणि त्या दैत्यापुढे सारे देवगण हतबल झाले , तेव्हा ब्रम्हा,विष्णू ,शिवासहित सारे देव त्याच पार्वती मातेला शरण गेले. मग साऱ्या सृष्टीच्या रक्षणासाठी आदिशक्ती दुर्गेचे रूप घेऊन महिषासुर आणि त्याच्या सैन्याशी नऊ दिवस झुंजली.आपल्या मुला-बाळांच्या रक्षणासाठी. 

                                             
            खरे तर , या पुराणकालीन गोष्टींवर कोणी किती विश्वास ठेवावा , त्या खऱ्या मानाव्यात कि नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न! परंतु , यातील नारीशाक्तीचे रूप मात्र निर्विवाद सत्यच!!!
                  
               या दोन्ही कथा जेव्हा मी ऐकते , वाचते ....दोन्हीमधील  विरोधाभास जाणवून येतो. पहिल्या प्रसंगात स्वतःच्या रक्षणासाठी असफल ठरलेल्या पार्वती मातेनेच नंतर साऱ्या देवतांचे आणि सृष्टीचे रक्षण केले.ज्या श्री विष्णूंनी त्यांचे रक्षण केले होते त्यांनीच भवानी मातेला सृष्टीचे रक्षण करण्याची प्रार्थना केली.पण हीच तर नारी शक्तीची खरी गंमत आहे. जी नारी, कधी कधी स्वतःचे रक्षण करण्यासाठी असमर्थ ठरते तीच आपल्या मुला-बाळांवर किंवा परिवारावर संकट आले तर मात्र रणरागिणी चंडीकेचे रूप धारण करते. आपली शक्ती , आपला पराक्रम स्वतःसाठी न वापरता आपल्या लेकरांसाठी , घरादारासाठी वापरण्यातच तिला अधिक धन्यता वाटते. आजच्या जगातही कदाचित घरात होणाऱ्या छळाला, स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराला ती अबला बनून मूकपणे सहन करेल  पण जर तीच वेळ तिच्या लेकरांवर आली तर मात्र आपले कोमल रूप सोडून कालीचा अवतार धारण करण्यास ती मागे पुढे पाहणार नाही. 

               
                       
                            आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सिंहावर आरूढ झालेल्या , हातात आयुधे घेतलेल्या, रौद्र रूप धारण केलेल्या दुर्गा मातेच्या  मूर्तीसमोर मी जेव्हा नतमस्तक होते ; तेव्हा ... आपल्या लहानग्या मुलीचे एका बिबट्यापासून रक्षण करण्यासाठी केवळ एका काठीच्या सहाय्याने झुंजणाऱ्या मातेचे मला दर्शन होते....आपल्या आई-वडिलांच्या रक्षणासाठी घरात घुसलेल्या आतंकवाद्यांचा धाडसाने मुकाबला करणाऱ्या त्या काश्मिरी मुलीचे दर्शन होते ....परिस्थितीला हार जाऊन  आत्महत्त्या करणाऱ्या आपल्या शेतकरी पतीच्या साऱ्या जबाबदाऱ्या आपल्या शिरावर उचलून  जगाला धीराने तोंड देणाऱ्या पत्नीचे दर्शन होते.....

        आज काळ बदलला आहे. 'त्याग' हेच स्त्रीचे जीवन मानणाऱ्या युगाला दूर लोटून स्त्रिया खूप पुढे निघून आल्या आहेत. आपल्या हक्कांसाठी जागरूक झाल्या आहेत. त्यांना आत्मभान आले आहे... या साऱ्या प्रवासात त्यांच्यात अनेक बरे-वाईट बदल झाले असतील परंतु, आजही स्त्रीची एक गोष्ट मात्र कायम आहे...तिचा लढाऊ बाणा, धीरोदात्तपणा. अनादी काळापासून स्त्री एक खरी लढवय्यी होती आणि आजही आहे. भविष्यातही  कायम असेल. आपल्या पूर्वजांना कदाचित याची जाणीव तेव्हाच झाली असावी. म्हणूनच स्त्रीच्या इतर कोणत्याही रूपापेक्षा तिच्या शाश्वत झुंजार रूपाचे त्यांनी पूजन केले....नवरात्रीचा सोहळा केला  तो आदिशक्ती, महानारी समरांगिनी दुर्गा मातेच्या शौर्याच्या , पराक्रमाच्या कौतुकासाठी!!!

                          
                                                                                                                                                                                     
                                          
       
                                   या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता | 
                     नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || 
                              

३ टिप्पण्या:

Alone Dreamer म्हणाले...

chanchalaa tu duradharshaa,
pushtaa tu gaj-gaamini |
swaamini panch-bhutaanchi,
yeyi mi tuj aaLavi...||

good post but lot of it is unidirectional...

Unknown म्हणाले...

I agree......but the whole aim of the post is to appreciate women's battling spirit..so i didn't mention other points as i felt inappropriate to cover them in the same post

Harshal म्हणाले...

Good one!!!

I think thats the reason people are feeling safe and happy once reached at home after heavy work load.

I just went back and thinking day-to-day activities of mother, "Ealry in the morning preparing tea for ME once finished, preparing meal for ME, while going to office all dry fruits dish is ready for ME. Once I am coming back from office, again tea with some snacks are ready for ME, before I demand for meal, dinner is ready for ME. Here, onething is common and i.e. "ME". May be the way of taking care is different but the motive is remains same."

Excellent delivery with appropriate examples, please keep it up!!!