२२ सप्टेंबर, २०१२

रद्दी


माझ्या कपाटात नको इतकी रद्दी भरलेली आहे , असं माझ्या घरच्यांचं अतिशय प्रांजळ मत आहे. ती साफ करण्यासाठी त्यांचा माझ्यामागे सारखा लकडा लागलेला असतो. मीही आज्ञाधारकपणे साफ-सफाई करतच असते.
                       सफाईसाठी जेव्हा मी कपाट उघडते, सर्वात आधी अंगावर येतो रंगीबेरंगी कोऱ्या कागदांचा गठ्ठा. मी ते कागद जमा करून ठेवले आहेत.कधी मला लिहायला काही सुचले तर लिहून ठेवण्यासाठी . पण, होते असे की जेव्हा जेव्हा मला काही लिहायला सुचते तेव्हा मी नेमकी कपाटाजवळ नसते. मग, जवळच्या वहीत लिहून ठेवते.(आतला आवाज : कधी सुचलं तर लिहायला म्हणून ही  वही कायम सोबत असते हि गोष्ट वेगळी ) म्हणून काही कोरे कागद रद्दी म्हणून टाकू शकत नाही न?(खर आहे  :)) त्या गठ्याच्या खाली आहेत ४-५ डायऱ्या.(प्रत्येक डायरीची फक्त पहिली ४ पाने भरलेली आहेत. ) आधी मी  वर्षाच्या पहिल्या दिवशी ;रोज नेमाने डायरी लिहायचीच असा संकल्प करायचे. (दरवर्षी संकल्पही अगदी नेमाने करायची ही ). आणि काही दिवस पाळायचेही.(फक्त मोजून  पहिले ४ दिवस ) खर  पुढे काही तो नेम टिकायचा नाही. मग पुढच्या वर्षी नवीन नेम करायचे (आदल्या वर्षीसारखाच)  परंतु नव्या वर्षी  जुन्याच डायरीमध्ये कसं  लिहिणार , हो ना? म्हणून मग त्या वर्षासाठी  नविन  डायरी! हल्ली  तो संकल्प करायचा नेम मी जरी बंद केला असला तरी काय माहित कधी पुन्हा वाटले  की 'लिहावी डायरी ' तर ? म्हणून जपून ठेवल्या आहेत त्या.(तरी ह्या वर्षीची एकही पान न भरलेली नवी डायरी आहेच त्यामध्ये! )
         
             मग दिसते ती एक मोठी पिशवी(तीच एक पिशवी ज्यामध्ये अनेक अनेक पिशव्या आहेत ). मला सर्वांना  स्वतःच्या हाताने सुंदर ग्रीटिंग करून देण्याची खूप हौस! (सुंदर हे विशेषण स्वतःच  लावलेले .लोकांनी दिलेले न्हवे) बऱ्याच जणांना मी करून दिलेली आहेत अशी ग्रीटींग्स.(फक्त ग्रीटींग्स बघून झाल्यावरचे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव  सांगायची तशी काही गरज  नसते .)त्यासाठी लागणारे वेगवेगळे  कागद, स्टिकर्स,लेस असं सगळ सामान त्यात आहे. हल्ली मी किती दिवसात(वर्षात ) नाही बनवले ग्रीटींग्स. (कारण बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की तिच्या शुभेच्छाच पुष्कळ आहेत. उगीच कशाला ग्रीटिंग बनवायचे कष्ट घेतेस? आता हे ग्रीटींग्स ठेवून घेण्यासारखे नसतात असं सरळ सरळ कोण बोलणार?) पण , कधी वाटल पुन्हा बनवावं तर सामान असायला हव न जवळ? (तशी शक्यता नाही).


                            
                   माझ्या कपाटाच्या मधल्या कप्प्यात आहे एक जाडजूड वही. (वहीपेक्षा कागदांचे भेंडोळे म्हणण योग्य वाटेल  ) ती आहे माझी खास रेसिपी बुक. जेव्हा मी नविन नविन स्वयंपाक करायला शिकत होते तेव्हा एक्स्पर्ट लोकांकडून घेतलेल्या पाककृती लिहून ठेवल्या आहेत. (जशा की शेजारच्या काकूंचा मसाले चहा, आजीच्या हाताचे भरले वांगे , चविष्ट सरबताचे योग्य प्रमाण  इत्यादी इत्यादी ...) काहीही असो , एक्स्पर्ट लोकांच्या  प्रमाणाने केलेला स्वयंपाक स्वादिष्ट होतोच होतो.(आता तर पुरणपोळ्याही अंदाजाने करते.आणि नाही म्हणता येणार नाही. तशा चांगल्या होतात 
      
   
   त्याखाली आहे एक फाईल. ज्यामध्ये गरजेची बिलं लावलेली आहेत.(शॉपिंगची आणि औषधाची) आता मला खरेदीची फारशी काही हौस नाही.(जशी जगातल्या कोणत्याच मुलीला नसते तशी ) पण जे काही सामान घेते त्याच बिलं तरी ठेवावच लागत ना जवळ? न जाणो कधी गरज पडेल?(त्यातलं बरंचस सामान तर आता वापरातही नाही आहे ). बाकी काही अलीकडे घेतलेल्या  औषधाची बिलं आहेत. (जवळ जवळ १०-१२ वर्षांपूर्वीची ) माझ तर स्पष्ट मत आहे, आपण घेतलेल्या औषधाच नाव आणि ते जिथून घेतलं त्या दुकानच नाव हे साभाळून ठेवलंच पाहिजे.(अगदी लहानपणी घेतलेल्या औषधाचही ? )

           सर्वात वरच्या कप्प्यात आहे माझा अनमोल ठेवा. माझ्या आवडत्या कविता असलेली पुस्तके(शाळेतील पाठ्यपुस्तके , बालभारतीची ). मला सगळ्यांनी सांगितलं की त्यातला कविता झेरॉक्स काढून घे किंवा लिहून ठेवून घे. परंतु, तुम्हीच सांगा की जुन्या पुस्तकांचा  वास घेत वाचलेल्या कवितांची मजा त्या झेरॉक्सच्या पानात कशी येणार? (त्याच साऱ्या कविता असलेल बरचस जुन कवितांच पुस्तकही आहेच त्यामध्ये ) तिथेच आहेत मी वापरलेल्या  पहिल्या मोबाईलचा बॉक्स आणि पहिल्या वहिल्या सीम कार्डचे कव्हर. आठवण म्हणून जपलेलं(जणू पहिल्या वहिल्या प्रेमाची प्रेमपत्रच आहेत जशी! ). तशी कपाटात काही नको असलेली कात्रणं , कागदपत्र आहेत(चला,  सापडलं एकदाच नको असलेल काहीतरी ) पण फारशी नाहीत(फक्त बांधला तर एखादा गठ्ठा होईल इतकीच आहेत ) ती काय पुन्हा कधीतरी टाकता येतील बघून(जशी इतक्या महिन्यात बघून टाकायची होती  तशी कधीतरी )
                                           
                    असं माझ  सगळ कपाट मी वरचेवर साफ करत असते. तरीही माझ्या घरातल्या लोकांना माझ्या कपाटात नेहमी रद्दी कशी काय दिसते,देव जाणे ! स्वभावाला औषध नाही हेच खर ......(अगदी खर आहे .....) चला, आता लवकरच मला पुन्हा माझ साफ कपाट, साफ करायला लागणार असं दिसतंय. कारण पुन्हा रद्दीचा लकडा सुरु झाला आहे माझ्या माग!!!!!!! (J )



२० सप्टेंबर, २०१२

जे जे उत्तम उदात्त उन्नत ........

    येणार येणार म्हणून आपण ज्यांची आतुरतेने वाट पहात होतो , ते गणराय आले ! वाजत , गाजत , भक्तांच्या प्रेमाने ओथंबून जात घरी-दारी प्रवेश करते झाले. सारे जण कसे उत्साहाने न्हाऊन गेले. धूप ,दीप , नैवेद्य अशा षोडोशोपचाराने  त्यांचे स्वागत झाले.आपले लाडके बाप्पा आपल्या घरी आले !!!
                           

          भारतीय लोकांचे उत्सव प्रेम तसे जगाला सर्वश्रुत आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी सण आहेत, समारंभ आहेत. अगदी बैलांपासून नागोबापर्यंत आणि हत्यारांपासून पुस्तकांपर्यंत ......प्रत्येकासाठी एक दिवस ...साजरा करण्याचा .  प्रत्येक सणाची संकल्पना जरी वेगळी असली तरी मला वाटते ,यामागचे तत्त्व मात्र एकच असावे . आपल्या संस्कृतीने हेतू परस्पर  हे सगळे सण आपल्या जीवनात सामाविष्ट केले असावेत. 

                   आपला भारतीय संस्कृतीचा  सर्वात मोठा उपचार म्हणजे हात जोडून, मस्तक झुकवून नमस्कार करणे.  जे जे थोर आहे , चांगले आहे त्या सर्वांसमोर नतमस्तक होणे.  मग ती थोर व्यक्ती असो,  कुणाचे कर्तुत्व असो की एखादी चांगली भावना ! विश्वातील सर्व सद हेतूंचा आदर करणे हाच आपल्या संस्कृतीचा  मूळ नियम आहे आणि आपल्या जीवनाचा आधारही. बहुतेक हे सारे सण त्याचेच  तर प्रतिक आहेत. आपल्या प्रत्येक सणातून आपण चांगल्या गुणांचा आदर करतो आणि त्यासमोर नतमस्तक होतो. 


जसे कि बैलपोळा म्हणजे कष्टांचे पूजन...उन्हा-तान्हात शेतात राबणाऱ्या बैलाशिवाय कष्टांचे मूर्तिमंत उदाहरण दुसरे कुठले असणार ?....म्हणूनच बैलाच्या रूपाने आपण कष्टांचीच पूजा करतो;

खंडेनवमी,दसरा हा शौर्याचा केलेला  आदर.....रामाने दसरया दिवशी आपल्या पराक्रमाची शर्थ करून रावणाचा अंत केला...पांडवांनी याच दिवशी शमीच्या वृक्षवारची शस्त्रे काढून आपला अज्ञातवास संपवला आणि शौर्याने कौरवांचा सामना केला ....म्हणूनच हत्यारांची पूजा करून आपण शौर्याची पूजा करतो;


गुढी पाडवा म्हणजे आरोग्याची जागृती......सूर्योदयापूर्वी उठणे आरोग्याला चांगले असते ....कडू असला तरी लिंब खाल्ल्याने सारे रोग लांब पळतात.....म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आरोग्याची मुहूर्तमेढ आपण रोवतो  ;

 होळी म्हणजे सुविचारांचा अंगीकार .....होळी पेटवून आपण आपले वाईट विचार भस्म करतो आणि चांगल्या विचारांची कास धरतो  ....
                          प्रत्येक सण म्हणजे सदगुणांचा जागर.  


           
         आणि आपला लाडका गणेश उत्सव? तो कशाचे प्रतिक आहे?
               परंपरेने  गणेशाला बुद्धीची देवता मानतात. गणेश उत्सवाचे महत्त्व बऱ्याच जणांनी नाना तऱ्हेने सांगितलेलेच आहे. पण , या दृष्टीकोनातून पाहताना वाटते ; हा तर  आपल्या अतिथी तत्वाचाच  सोहळा आहे. 'अतिथी देवो भवः!'   घरी आलेल्या अतिथीचा देव मानून पाहुणचार करणे ही आपली रीत आहे आणि या उक्तीला गणेश उत्सवाच्या  पाच दिवसात आपण अक्षरशः जागतो . गणपती बाप्पा अतिथी बनून आपल्या घरी येतात. आपण आपल्या सगळ्या विवंचना , अडचणी विसरून जातो आणि पूजा , नैवेद्य , आरती अशा  विविध प्रकारांनी बाप्पांचे  आतिथ्य करतो. पाच दिवसांनी येते विसर्जनाची वेळ. त्या वेळी आपण आपल्या लाडक्या पाहुण्याला निरोप देतो ते  पुढच्या वर्षी लवकर येण्याची गळ घालूनच. हे पाच दिवस आपण आपली सर्व कामे,  सगळी दुःखे विसरून गणरायांच्या सेवेत रममाण होतो.  मग  हा आपल्या अतिथी सत्काराचाच सोहळा नाही का झाला

                          असे म्हणतात की श्री गुरुदेव दत्तांनी २१ गुरु केले होते .अगदी मुंगीपासून , मधमाशीपर्यंत. यातला अध्यात्मिक  भाग जरी सोडला तरी यामागची प्रेरणा तरी हीच आहे न कि जे जे उत्तम आहे , उदात्त आहे त्याची महानता मान्य करणे. थोडक्यात काय , जे जे चांगले आहे, अंगीकारण्याजोगे आहे त्यासमोर नतमस्तक होणे हाच तर आपल्या प्रत्येक सणाचा अर्थ आहे. तो साजरा करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी सुंदर रीतीने वेगवेगळी प्रतीके देऊन त्याला उत्सवाच्या घडीमध्ये दुमडले आहे...  नकळत ... .......!   
सावरकरांच्या भाषेत; 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते !'  हाच आहे आपल्या प्रत्येक   सणामागचा गर्भित भाव .
       
            आता काळाच्या ओघात , विचारांच्या गोंधळात पूजेचे अवडंबर झाले असले , तरी आजही आपल्या भारतीय संस्कृतीचा  मूलमंत्र तोच आहे आणि कदाचित भविष्यातही तसाच राहील . आज कालच्या मुल्यरहित आणि दुर्गुणांचा उदो उदो करणाऱ्या जगात  आपल्या अहंकाराचा नाश व्हावा, जे जे उत्तम उदात्त उन्नत आहे...त्यासमोर नतमस्तक होता यावे आणि  त्याचा अंगीकार करण्याची बुद्धी व्हावी हीच बाप्पा चरणी प्रार्थना !!!




१६ सप्टेंबर, २०१२

निर्भेळ !!!!


           जेव्हा जेव्हा मी एखाद्या गोष्टीची  व्याख्या वाचते किंवा संज्ञा ऐकते ....माझ्या मनात नेहमी एक विचार येतो . जर कधी आपल्याला मानवी भावनांची व्याख्या करायची झाली तर ती काय होईल???
                      म्हणजे उदाहरणार्थ , 'राग'राग म्हणजे नेमकं काय  अस जर कुणी विचारलं तर आपण काय सांगू? प्रयत्न करूया?????? अं......."राग म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा स्वतःवरील ताबा सुटतो , डोळे लाल होतात , विचार करण्याची प्रक्रिया बंद होते, वगैरे वगैरे ......" अहं ....   पण , केवळ हीच रागाची सरळधोपट व्याख्या कशी होईल ?  कारण प्रत्येक व्यक्तीची राग आल्या नंतरची प्रतिक्रिया सारखी कुठे असते??? कोणी आदळआपट , तोडफोड करेल; कोणी आरडा-ओरडा करेल; तर कोणी बोलणचं टाकून देईल....जितक्या व्यक्ती , तितक्या प्रकृती! त्यामुळे सगळ्यांना लागू होईल अशी एकच व्याख्या कशी करता येईल, नाही का?  केवळ 'राग' चं  नव्हे  ; तर जितक्या मानवी भावना आहेत .....आनंद , दुःख ,निराशा ,आश्चर्य ........प्रत्येक भावनेबाबतीत असेच म्हणता येईल. शब्दांत कशी करणार त्यांची व्याख्या?   

        या भावनांना शब्दांत बांधणे जितके कठीण  तितकेच एकमेकांपासून विलग करणे हि अवघडच !  सगळ्या भावना एकमेकांत मिसळलेल्या रंगांसारख्या आहेत जणू! 
...आपण कोणते रंग एकमेकांत मिसळले आहेत ते ओळखू शकतो पण ,  एकमेकांतून ते वेगळे नाही करू शकत. आता हेच पहा ना! एखादे यश मिळाल्यावर आपल्याला खूप आनंद होतो पण, तो फक्त आनंद कुठे असतो?  आपण केलेल्या कष्टांचे फळ मिळाले म्हणून झालेले समाधान हि त्यात असतेच की सामावलेले . आणि जर मिळालेले यश अनपेक्षित असेल तर आश्चर्याचा सुखद धक्का ही असतोच  सोबतीला. किंवा एखादी गोष्ट नाही झाली आपल्या मनासारखी तर आपण चिडतो ; तेव्हा अपेक्षाभंगाची निराशा नाही वेगळी काढता येत त्यातून. कधी कोणी काही बोललं तर आपण रागावतो त्या व्यक्तीवर. पण , झालेल्या अपमानाचा सल असतोचं  त्यात कुठे तरी. या सगळ्या भावना कशा नकळत एकमेकांत मिसळलेल्या असतात. त्यातली कोणती  केवळ एकंच भावना नाही अनभवू शकत आपण ....तिच्या खऱ्या रुपात...!
                        किती मजेशीर आहे ना हा भाव-भावनांचा खेळ ? म्हणजे राग, लोभ, प्रेम, दुःख या सगळ्या भावना कशा असतात हे  खर तर  सगळ्यांनाच माहित असत. परंतु , ना आपण त्यांची व्याख्या करू शकतो ; ना त्यांना वेगवेगळ अनभवू शकतो ..........
                                  जर आपण  हे सगळे रंग एकमेकांत योग्य प्रमाणात मिसळले तर काय होईल??? ..............उरेल केवळ एकंच रंग.....'पांढरा' !
रंगात रंगुनी साऱ्या रंग त्याचा वेगळा !!!! तो बनलेला तर  असतो साऱ्या रंगांपासून पण त्याला स्वतःला मात्र कोणताच रंग नसतो .... त्यातून कोणता रंग  वेगळाही  नाही करता येत . 
            मग समजा ,  जर आपण सगळ्या भावना सारख्या प्रमाणात मिसळल्या तर काय उरेल ???........................उरेल एक  अशी अवस्था जिला कोणतीच भावना नाही.....यालाच तर स्थितप्रज्ञ अवस्था म्हणत नसतील???म्हंटल  सगळ्या भावना  आहेत पण , तरीही कोणतीच भावना नाही ..पांढरया रंगासारखी अवस्था ... स्वच्छ , निर्मळ, निर्भेळ !!!!
                                    कदाचित यालाच योगी, संन्यासी निर्विकार , निर्गुण म्हणत असतील.......सर्व काही असूनही , काहीच नाही !!!!!....
         मलाही अनुभवायचा आहे असा पांढरा रंग ..सगळ्यात मिसळलेला  पण  तरीही सगळ्यापेक्षा  वेगळा ............स्वच्छ , निर्मळ, निर्भेळ !!!!











अव्यक्त


                  अव्यक्त 






 ब्लॉग लिहिण्याचा विचार बरेच दिवस माझ्या मनात घोळत होता. सुरवातीला मी काही मनावर घेतलं नाही. पण , हा विचार काही केल्या मला स्वस्थ बसू देत नव्हता. काहीतरी होत जे आतून मला सतत उस्फूर्त करत होत.
                   नेमकं काय होत ते ????? कदाचित मनातले विचार सगळ्यांसमोर  मांडायची उर्मी असेल ती.....थोडक्यात काय तर मला व्यक्त व्हायचं होत ....पण मला जे व्यक्त करायचं होत तो काही भावनांचा निचरा नव्हता. म्हणजे मी रागावले आहे , खूष आहे  किंवा दुःखी आहे म्हणून मला मन हलक करावस वाटत होत... तर तसं काही नव्हत ....काही गोष्टी ज्या मला सुचल्या , जाणवल्या त्या सर्वांसमोर मांडायच्या होत्या. थोडक्यात सर्वांशी शेअर करायच्या होत्या. खर तर त्या सगळ्याचा आपल्या रोजच्या व्यवहाराशी काहीच संबंध नव्हता  पण तरीही मला  ते सार  व्यक्त करायचं होत .. ........का? माहित नाही.
         जेव्हा मी याबद्दल विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आल की , हि काही माझ्या एकटीची गरज नाही. कदाचित प्रत्येकालाच अस वाटत असावं.. प्रत्येक जणच  व्यक्त व्हायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाची भाषा निराळी , माध्यम निराळ पण कारण मात्र एकंच , सर्वांसमोर व्यक्त होणे..........
                            रोज सूर्य एका बाजूने उगवतो आणि दुसऱ्या बाजूने मावळतो , किंवा हि नदी समुद्राच्या ओढीने सतत वाहतच असते ,,,त्यात असं काय वेगळ असणार आहे हो? पण एका चित्रकाराला त्यात नविन रंग दिसतो, वेगळ रूप भावत आणि ते सार तो कागदावर उतरवतो. ते त्याच व्यक्त होणंच तर आहे ना.. ..रंगांच्या मदतीने....पण कशासाठी?   
               अभंगातून पांडुरंग आळवणारे संत असोत व दोन जीवांच्या मिलनाचे गीत गाणारे प्रेमकवी .....शब्दांना धरून ते  स्वःत  व्यक्तच तर होत असतात न
                           कलाकारांच राहू दे! बहुतेक त्यांचा जन्मच व्यक्त होण्यासाठी असतो. पण, आपल्यासारख्या सर्व-सामान्यांचं काय? विविध सभा , परिषदा ,  परिसंवाद , स्नेहसंमेलने ...विविध विषय ,इतकी सारी चर्चा ... हि सारी धडपड कशासाठी आणि कुणासाठी? ..आपले विचार व्यक्त करण्यासाठीच ना
                          का इतकं महत्वाचं आहे हे व्यक्त होण? म्हणजे आपल्याला एखाद्या सिनेमा बद्दल काय वाटल हे नाही सांगितलं कुणाला तर जग थोडंच थांबणार आहे? तरीही आपण धडपडतोच की..  कुणाला तरी ते सांगण्यासाठी. कोणाला चविष्ट खाण्याचा नविन अड्डा सापडलेला असतो ; कोणाला एखाद्या विषयाची नविन माहिती मिळालेली असते ; तर कोणाला बरेच दिवस न सुटलेल्या कोड्याच उत्तर सापडलेलं असत आणि ते सगळेजण कोणाशी तरी शेअर करण्यासाठी बेचैन झालेले असतात . पण,  का होत असेल असं? वर वर व्यवहाराशी निरर्थक वाटणाऱ्या या गोष्टी व्यक्त करण्याची हि उर्मी कोणती असेल ??
                                खूप विचार केला , पण मला काही सापडलं नाही याच उत्तर. मग म्हटलं तुमच्यासमोर व्यक्त कराव सगळ ........तुम्हीही विचार करून पहा ........कदाचित तुम्हाला सापडेल याच उत्तर....


१४ सप्टेंबर, २०१२

आज रोजी...!

                                   

आज रोजी.........!






तोच सूर्य नव्याने उगवला ....
त्याच दिशा नव्याने उजळल्या ...
तीच किलबिल , तेच नाद, तीच लगबग पण तरीही सर्व नव्याने. कारण, आजचा येणारा प्रत्येक क्षण नविन असेल.
नविन आशा , नवी स्वप्ने ......नव्या आजचे सर्वच नवे.......!
          कदाचित काही विचारही नवे असतील. काही जुनेच विचार नविन रंगात न्हाऊन येतील. कधी काळी  शिळोप्याचे  म्हणून बाजूला ठेवलेले काही पुन्हा नव्याने सापडतील  आणि  इतके  दिवस उराशी जपून ठेवलेले  काही अडगळीत ही जातील.
                  रोज येणाऱ्या दिवसाप्रमाणे त्या त्या वेळेचे विचार ही बदलत जातात.
काही घट्ट होत जातात तर काही बारगळतात.  पण, एक मात्र नक्की कि आज येणारा विचार हा फक्त आजचा असतो. माहित नाही उद्या त्याचे काय होईल. म्हणून तो आजच कैद करून ठेवावा.

            असेच त्या त्या दिवसाचे विचार त्या त्या दिवसाच्या नावे करून ठेवण्यासाठी हा ब्लॉग...........आज रोजी !!!