५ ऑक्टोबर, २०१२

कम्फर्ट झोन

            माझ्या ओळखीचे एक सद्गृहुस्थ आहेत. त्यांना मी माझ्या कामाच्या ठिकाणी अनेक वेळा पहिले आहे. अतिशय शांत, मोजून-मापून शब्द वापरणारा माणूस! पण, जेव्हा काही कार्यक्रमामध्ये त्यांची भेट झाली तेव्हा मात्र मी चकितच झाले. सर्वांमध्ये हसत खेळत बोलणारा हा माणूस माझ्या ओळखीचा आहे का असा प्रश्न मला पडला. कारण, एकाच दिवशी ते इतके सगळे शब्द बोलू शकतात हे मला पहिल्यांदाच कळले होते. अगदी फिल्मी स्टाईलमध्ये 'कही कुंभ के मेले में बीछडे जुडवा भाई तो नही?' असा प्रश्न मला पडावा इतके त्यांचे वागणे विरुद्ध होते आणि एकाच माणसाचे दोन वेगवेगळे स्वभाव कसे असू शकतात याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते.
               
                     पण, मी लक्ष देवून बघितल्यानंतर असे बरेचसे लोक माझ्या आजूबाजूला  आढळले.कोणी आपल्या मित्र-मैत्रिणी बरोबर अगदी मोकळेपाने बोलतात पण इतर ठिकाणी मात्र तो मोकळेपणा हरवून जातो; कोणी घराबाहेर पडले की बटन दाबल्यासारखे दंग-मस्तीची ट्यून पकडतात तर कोणी फक्त घरातच राजे असतात. काही जण सहलीला गेले कि दिल खोलके जगतील परंतु, परत आले की सहलीत भेटलेला माणूस हाच का असा प्रश्न पडेल इतके जीवनाशी बेसूर होतील.....
                   
                  माझ्या  वाचनात एकदा आले होते , प्रत्येक माणसाचा स्वतःचा एक कम्फर्ट झोन असतो.त्यामध्ये प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित समजून मोकळेपणाने  जगत असतो.या कम्फर्ट झोनमध्ये काही ठिकाणे असतात , काही माणसे आणि  काही भूतकाळातल्या घटनाही असू शकतात ज्या आठवून आपल्याला बरे वाटते. काही गोष्टी किंवा  काही ठिकाणे ही आपल्या या कम्फर्ट झोनच्या बाहेर असतात; जिथे वावरताना आपल्या मनावर नकळत दडपण येत. अशा ठिकाणी जरी आपली इच्छा असली तरीही तो खुलेपणा वागण्यात नाही येवू शकत. आणि हे सगळ जाणून-बुजून कुठे होत असतं की जे आपल्या लक्षात येईल? सगळ काही  आपल्याही नकळत घडत असतं.


              
           हे सगळ बोलायला कस अगदी रंजक वाटत पण ते तितकच समजायला कठीण आणि जाणून घ्यायला अवघड आहे. या आपल्या कम्फर्ट झोनचा जो मनातला कप्पा असतो त्याची आपल्याला कधी जाणीवही नसते. जरी झाली तरी तिकडे लक्ष देण आपल्याला महत्वाच वाटत नाही  किंवा तेवढा वेळ नसतो आपल्याकडे.
           
                       काय असेल या कम्फर्ट झोनच्या अंधाऱ्या गुहेतील रहस्य? मी जेवढा विचार केला तेवढ मला वाटल की ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात त्यांचा परिणाम होतोच आपल्या मनावर! अशीच एखादी गोष्ट असावी जी बीज बनून मनात रुजली जात असेल. त्याला नकारात्मक विचारांचे खतपाणी मिळाले की बघता बघता त्या बी चे  वटवृक्षात कधी रुपांतर होते कळतच नाही. हा असुरक्षिततेचा वटवृक्ष एकदा फोफावला की ती संबंधित गोष्ट किंवा ठिकाण आपल्या त्या कम्फर्ट झोनच्या कधी बाहेर जाते हे आपल्याला कळतसुद्धा नाही. या सगळ्याच हेच एकमेव कारण असेल असंच काही नाही पण मला सुचलेलं आणि पटलेलं एकंच. 
         
           पण , तरीही काही  प्रश्न मात्र उरलेच आहेत. हा कम्फर्ट झोने बदलता येतो कात्याबाहेर असलेल्या गोष्टी लक्ष्मण-रेषेच्या आत घेता येतात का? माझ उत्तर तरी हो आहे. आणि ते माझ्या अनुभवावरून मला सापडलं आहे....लहानपणी मला कोणी कुणाच्या लग्नाला चल म्हटलं तर अगदी जीवावर यायचं. बाकीचा कोणताही समारंभ असेल तर मी सगळ्यात आधी पुढे असायचे पण एकंदर हा लग्न प्रकार मात्र माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचा होता. तिथे गेले की इतर वेळी सगळ्यांच्यात मिळून मिसळून असणारी, दंग-मस्ती करणारी मी कुठेतरी आत बंद व्हायची. तिथे जर मला कोणी भेटले तर मी पण हसून प्रतिसाद द्यायचे पण अगदी मोघम आणि स्वतःहून तर कधीच कोणाशी बोलायला जायचे नाही. त्यामुळे कोणाच्या तरी लग्नात जे मला पहिल्यांदा भेटले असतील त्यांचा माझ्याविषयी एक शांत, न बोलणारी, लोकांमध्ये न मिसळणारी मुलगी असा गैरसमज सहजच झाला असेल. जर कधी त्यांनी मला बाकीच्या समारंभात पाहिलं तर मात्र सगळ्यांशी हसून-खेळून बोलणारी मुलगी हीच ती होती  का असा प्रश्न त्यांना नक्कीच पडला असेल. का माहिती नाही पण त्या वेळी मात्र लग्नाच्या ओळखी-अनोळखी गर्दीचा भाग होऊन राहणे मला काहीसे न रुचणारे होते. पण, हळूहळू ते बदलत गेले. लग्नाच्या आनंदी वातावरणात रमून जाणे माझ्या कम्फर्ट झोनच्या यादीत कधी सामील झाले ते माझे मलाही कळले नाही. माझ्या त्या बंद कप्प्याचे दार कधी आणि कसे उघडले हे मात्र मला आता आठवत नाही .

                        या सगळ्या गोष्टींचा विचार करताना माझ्या लक्षात आले की प्रत्येक माणसाचा कम्फर्ट झोन हा वेगळा असतो. अगदी एकाच कुटुंबातील दोन  माणसांचाही... प्रत्येकाच्या मनाचा हा कप्पा त्याच्या त्याच्या स्वभावानुसार , आवडी-निवडीनुसार ठरत असावा बहुतेक ! आणि वेळेनुसार त्यात बदलही घडून येवू शकतो हे स्वानुभवावरून मी तरी म्हणू शकते.
               
                  या गोष्टींचा आपण कधी जाणीवपूर्वक विचारच करत नाही. जर कधी केला तर आपल्याला कळू शकतील अशा गोष्टी ज्या आपण खुल्या मनाने  उपभोगल्याच नाहीत. त्यामागे दडलेली कारणे, घटना शोधू शकू आपण. जर काही नकारात्मक विचार , असुरक्षिततेची भावना असेल तर त्यांना काढून टाकू शकू........काय साध्य होईल या सगळ्यातून? कदाचित आपण अशा काही गोष्टी करू शकू  ज्या कधीच केल्या नाहीत आजपर्यंत ....कुठली तरी नवीन संधी मिळेल आपल्याला जी आजपर्यंत आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होती.

                      "जिंदगी न मिलेगी दोबारा' चित्रपट आठवतोय? हेच तर केल त्या  तिघांनी त्यामध्ये....प्रत्येकाने अशी गोष्ट शोधून काढली जी त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होती. मग धाडसी खेळ असुदे किंवा आपल्या  भावनांचा स्वीकार .. जस की ह्रितिकला कळाल की आजपर्यंत पैसे कमवण्याबाहेर आयुष्य जगण त्याला कधी जमलच नाही....किंवा मग अभय च उदाहरण.....त्याला कळाल होत की त्याला जशा मुलीशी लग्न करायचं होत तशी त्याची होणारी बायको नाही आहे. पण हे तो फक्त तिलाच न्हवे तर स्वतःलाही सांगायला घाबरत होता. शेवटी जेव्हा त्यांनी ह्या गोष्टी स्वतःशीच कबूल केल्या तेव्हाच ते बाहेर आले आपल्या झोन मधून......नवीन आयुष्य जगायला ......


         
             तुम्हीही शोध अशा गोष्टी ज्या तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहेत. त्या तशा का आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्या मनाचे हे बंद खण उघडता येतील का? करून तरी पहा ...कदाचित तुम्हाला अशा काही प्रश्नांचीही उत्तरे सापडतील जे आपल्याला अजून कधी पडलेच नाहीत.........................

५ टिप्पण्या:

Alone Dreamer म्हणाले...

Very good post.
The truth that everyone knows but never follows.

Unknown म्हणाले...

:)

Unknown म्हणाले...

Very nice...Keep it up

Unknown म्हणाले...

धन्यवाद! आपल्या सदिच्छा अशाच मिळत राहोत.........:)

Harshal म्हणाले...

Nice One!!!

“Comfort Zone” which is explained comfortably. The beauty of this post is their examples which given via photos, specially one sentence “कदाचित आपण अशा काही गोष्टी करू शकू ज्या कधीच केल्या नाहीत आजपर्यंत....कुठली तरी नवीन संधी मिळेल आपल्याला जी आजपर्यंत आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होती.“ followed by fish and her new era of life which she is trying to get in the form of new big pond. Excellent, Appreciate it!!!

Thanks for sharing and please keep it up!!!