२० सप्टेंबर, २०१२

जे जे उत्तम उदात्त उन्नत ........

    येणार येणार म्हणून आपण ज्यांची आतुरतेने वाट पहात होतो , ते गणराय आले ! वाजत , गाजत , भक्तांच्या प्रेमाने ओथंबून जात घरी-दारी प्रवेश करते झाले. सारे जण कसे उत्साहाने न्हाऊन गेले. धूप ,दीप , नैवेद्य अशा षोडोशोपचाराने  त्यांचे स्वागत झाले.आपले लाडके बाप्पा आपल्या घरी आले !!!
                           

          भारतीय लोकांचे उत्सव प्रेम तसे जगाला सर्वश्रुत आहे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी सण आहेत, समारंभ आहेत. अगदी बैलांपासून नागोबापर्यंत आणि हत्यारांपासून पुस्तकांपर्यंत ......प्रत्येकासाठी एक दिवस ...साजरा करण्याचा .  प्रत्येक सणाची संकल्पना जरी वेगळी असली तरी मला वाटते ,यामागचे तत्त्व मात्र एकच असावे . आपल्या संस्कृतीने हेतू परस्पर  हे सगळे सण आपल्या जीवनात सामाविष्ट केले असावेत. 

                   आपला भारतीय संस्कृतीचा  सर्वात मोठा उपचार म्हणजे हात जोडून, मस्तक झुकवून नमस्कार करणे.  जे जे थोर आहे , चांगले आहे त्या सर्वांसमोर नतमस्तक होणे.  मग ती थोर व्यक्ती असो,  कुणाचे कर्तुत्व असो की एखादी चांगली भावना ! विश्वातील सर्व सद हेतूंचा आदर करणे हाच आपल्या संस्कृतीचा  मूळ नियम आहे आणि आपल्या जीवनाचा आधारही. बहुतेक हे सारे सण त्याचेच  तर प्रतिक आहेत. आपल्या प्रत्येक सणातून आपण चांगल्या गुणांचा आदर करतो आणि त्यासमोर नतमस्तक होतो. 


जसे कि बैलपोळा म्हणजे कष्टांचे पूजन...उन्हा-तान्हात शेतात राबणाऱ्या बैलाशिवाय कष्टांचे मूर्तिमंत उदाहरण दुसरे कुठले असणार ?....म्हणूनच बैलाच्या रूपाने आपण कष्टांचीच पूजा करतो;

खंडेनवमी,दसरा हा शौर्याचा केलेला  आदर.....रामाने दसरया दिवशी आपल्या पराक्रमाची शर्थ करून रावणाचा अंत केला...पांडवांनी याच दिवशी शमीच्या वृक्षवारची शस्त्रे काढून आपला अज्ञातवास संपवला आणि शौर्याने कौरवांचा सामना केला ....म्हणूनच हत्यारांची पूजा करून आपण शौर्याची पूजा करतो;


गुढी पाडवा म्हणजे आरोग्याची जागृती......सूर्योदयापूर्वी उठणे आरोग्याला चांगले असते ....कडू असला तरी लिंब खाल्ल्याने सारे रोग लांब पळतात.....म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आरोग्याची मुहूर्तमेढ आपण रोवतो  ;

 होळी म्हणजे सुविचारांचा अंगीकार .....होळी पेटवून आपण आपले वाईट विचार भस्म करतो आणि चांगल्या विचारांची कास धरतो  ....
                          प्रत्येक सण म्हणजे सदगुणांचा जागर.  


           
         आणि आपला लाडका गणेश उत्सव? तो कशाचे प्रतिक आहे?
               परंपरेने  गणेशाला बुद्धीची देवता मानतात. गणेश उत्सवाचे महत्त्व बऱ्याच जणांनी नाना तऱ्हेने सांगितलेलेच आहे. पण , या दृष्टीकोनातून पाहताना वाटते ; हा तर  आपल्या अतिथी तत्वाचाच  सोहळा आहे. 'अतिथी देवो भवः!'   घरी आलेल्या अतिथीचा देव मानून पाहुणचार करणे ही आपली रीत आहे आणि या उक्तीला गणेश उत्सवाच्या  पाच दिवसात आपण अक्षरशः जागतो . गणपती बाप्पा अतिथी बनून आपल्या घरी येतात. आपण आपल्या सगळ्या विवंचना , अडचणी विसरून जातो आणि पूजा , नैवेद्य , आरती अशा  विविध प्रकारांनी बाप्पांचे  आतिथ्य करतो. पाच दिवसांनी येते विसर्जनाची वेळ. त्या वेळी आपण आपल्या लाडक्या पाहुण्याला निरोप देतो ते  पुढच्या वर्षी लवकर येण्याची गळ घालूनच. हे पाच दिवस आपण आपली सर्व कामे,  सगळी दुःखे विसरून गणरायांच्या सेवेत रममाण होतो.  मग  हा आपल्या अतिथी सत्काराचाच सोहळा नाही का झाला

                          असे म्हणतात की श्री गुरुदेव दत्तांनी २१ गुरु केले होते .अगदी मुंगीपासून , मधमाशीपर्यंत. यातला अध्यात्मिक  भाग जरी सोडला तरी यामागची प्रेरणा तरी हीच आहे न कि जे जे उत्तम आहे , उदात्त आहे त्याची महानता मान्य करणे. थोडक्यात काय , जे जे चांगले आहे, अंगीकारण्याजोगे आहे त्यासमोर नतमस्तक होणे हाच तर आपल्या प्रत्येक सणाचा अर्थ आहे. तो साजरा करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी सुंदर रीतीने वेगवेगळी प्रतीके देऊन त्याला उत्सवाच्या घडीमध्ये दुमडले आहे...  नकळत ... .......!   
सावरकरांच्या भाषेत; 'जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते !'  हाच आहे आपल्या प्रत्येक   सणामागचा गर्भित भाव .
       
            आता काळाच्या ओघात , विचारांच्या गोंधळात पूजेचे अवडंबर झाले असले , तरी आजही आपल्या भारतीय संस्कृतीचा  मूलमंत्र तोच आहे आणि कदाचित भविष्यातही तसाच राहील . आज कालच्या मुल्यरहित आणि दुर्गुणांचा उदो उदो करणाऱ्या जगात  आपल्या अहंकाराचा नाश व्हावा, जे जे उत्तम उदात्त उन्नत आहे...त्यासमोर नतमस्तक होता यावे आणि  त्याचा अंगीकार करण्याची बुद्धी व्हावी हीच बाप्पा चरणी प्रार्थना !!!




३ टिप्पण्या:

Alone Dreamer म्हणाले...

chhaan...

Unknown म्हणाले...

धन्यवाद!!

Harshal म्हणाले...

Good explanation of our tradition, thanks for sharing and please keep it up!!!