माझ्या कपाटात नको इतकी रद्दी भरलेली आहे , असं माझ्या घरच्यांचं अतिशय प्रांजळ मत
आहे. ती साफ करण्यासाठी त्यांचा माझ्यामागे सारखा लकडा लागलेला असतो. मीही
आज्ञाधारकपणे साफ-सफाई करतच असते.
सफाईसाठी जेव्हा मी कपाट उघडते, सर्वात आधी अंगावर येतो रंगीबेरंगी कोऱ्या कागदांचा
गठ्ठा. मी ते कागद जमा करून ठेवले आहेत.कधी मला लिहायला काही सुचले तर लिहून ठेवण्यासाठी . पण, होते असे की जेव्हा जेव्हा मला काही
लिहायला सुचते तेव्हा मी नेमकी कपाटाजवळ नसते. मग, जवळच्या वहीत लिहून ठेवते.(आतला आवाज : कधी सुचलं तर लिहायला म्हणून ही वही कायम सोबत असते हि गोष्ट
वेगळी ) म्हणून
काही कोरे कागद रद्दी म्हणून टाकू शकत नाही न?(खर आहे :)) त्या गठ्याच्या खाली आहेत ४-५ डायऱ्या.(प्रत्येक डायरीची फक्त पहिली ४ पाने भरलेली आहेत. ) आधी मी वर्षाच्या पहिल्या दिवशी ;रोज नेमाने डायरी लिहायचीच असा संकल्प
करायचे. (दरवर्षी संकल्पही अगदी
नेमाने करायची ही ). आणि
काही दिवस पाळायचेही.(फक्त मोजून पहिले ४ दिवस ) खर पुढे काही तो नेम टिकायचा नाही. मग पुढच्या वर्षी
नवीन नेम करायचे (आदल्या वर्षीसारखाच) परंतु नव्या वर्षी जुन्याच
डायरीमध्ये कसं लिहिणार , हो ना? म्हणून मग त्या वर्षासाठी नविन डायरी! हल्ली तो
संकल्प करायचा नेम मी जरी बंद केला असला तरी काय माहित कधी पुन्हा वाटले की 'लिहावी डायरी ' तर ? म्हणून जपून ठेवल्या आहेत त्या.(तरी ह्या वर्षीची एकही पान न भरलेली नवी डायरी आहेच त्यामध्ये! )
मग दिसते ती एक मोठी
पिशवी(तीच एक पिशवी ज्यामध्ये अनेक अनेक पिशव्या आहेत ). मला सर्वांना स्वतःच्या हाताने
सुंदर ग्रीटिंग करून देण्याची खूप हौस! (सुंदर हे विशेषण स्वतःच लावलेले .. लोकांनी दिलेले न्हवे) बऱ्याच जणांना मी करून दिलेली आहेत अशी
ग्रीटींग्स.(फक्त ग्रीटींग्स बघून झाल्यावरचे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगायची
तशी काही गरज नसते .)त्यासाठी लागणारे वेगवेगळे कागद, स्टिकर्स,लेस असं सगळ सामान त्यात आहे. हल्ली मी
किती दिवसात(वर्षात ) नाही बनवले ग्रीटींग्स. (कारण
बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की तिच्या शुभेच्छाच पुष्कळ आहेत. उगीच
कशाला ग्रीटिंग बनवायचे कष्ट घेतेस? आता हे ग्रीटींग्स ठेवून घेण्यासारखे
नसतात असं सरळ सरळ कोण बोलणार?) पण , कधी वाटल पुन्हा बनवावं तर सामान असायला हव न जवळ? (तशी शक्यता नाहीच).
माझ्या कपाटाच्या मधल्या कप्प्यात आहे
एक जाडजूड वही. (वहीपेक्षा कागदांचे भेंडोळे म्हणण योग्य वाटेल ) ती आहे माझी खास रेसिपी बुक. जेव्हा मी
नविन नविन स्वयंपाक करायला शिकत होते तेव्हा एक्स्पर्ट लोकांकडून घेतलेल्या पाककृती लिहून ठेवल्या आहेत. (जशा की शेजारच्या काकूंचा मसाले चहा, आजीच्या हाताचे भरले वांगे , चविष्ट सरबताचे योग्य प्रमाण इत्यादी इत्यादी ...) काहीही असो , एक्स्पर्ट
लोकांच्या प्रमाणाने
केलेला स्वयंपाक स्वादिष्ट होतोच होतो.(आता तर पुरणपोळ्याही अंदाजाने करते.आणि नाही म्हणता येणार नाही. तशा चांगल्या होतात )
त्याखाली आहे एक फाईल. ज्यामध्ये गरजेची बिलं लावलेली आहेत.(शॉपिंगची आणि औषधाची) आता मला खरेदीची फारशी काही हौस नाही.(जशी जगातल्या कोणत्याच मुलीला नसते तशी ) पण जे काही सामान घेते त्याच बिलं तरी ठेवावच लागत ना जवळ? न जाणो कधी गरज पडेल?(त्यातलं बरंचस सामान तर आता वापरातही नाही आहे ). बाकी काही अलीकडे घेतलेल्या औषधाची बिलं आहेत. (जवळ जवळ १०-१२ वर्षांपूर्वीची ) माझ तर स्पष्ट मत आहे, आपण घेतलेल्या औषधाच नाव आणि ते जिथून घेतलं त्या दुकानच नाव हे साभाळून ठेवलंच पाहिजे.(अगदी लहानपणी घेतलेल्या औषधाचही ? )
सर्वात वरच्या कप्प्यात आहे माझा अनमोल ठेवा. माझ्या आवडत्या कविता असलेली
पुस्तके(शाळेतील पाठ्यपुस्तके , बालभारतीची ). मला सगळ्यांनी सांगितलं की त्यातला
कविता झेरॉक्स काढून घे किंवा लिहून ठेवून घे. परंतु, तुम्हीच सांगा की जुन्या पुस्तकांचा वास घेत वाचलेल्या
कवितांची मजा त्या झेरॉक्सच्या पानात कशी येणार? (त्याच साऱ्या कविता असलेल बरचस जुन कवितांच पुस्तकही आहेच त्यामध्ये ) तिथेच आहेत मी वापरलेल्या पहिल्या मोबाईलचा
बॉक्स आणि पहिल्या वहिल्या सीम कार्डचे कव्हर. आठवण म्हणून जपलेलं(जणू
पहिल्या वहिल्या प्रेमाची प्रेमपत्रच आहेत जशी! ). तशी कपाटात काही नको असलेली कात्रणं , कागदपत्र आहेत(चला, सापडलं एकदाच नको असलेल काहीतरी ) पण फारशी नाहीत(फक्त बांधला तर
एखादा गठ्ठा होईल इतकीच आहेत ) ती काय पुन्हा कधीतरी टाकता येतील बघून(जशी
इतक्या महिन्यात बघून टाकायची होती तशी कधीतरी )
असं माझ सगळ कपाट मी वरचेवर साफ करत असते. तरीही माझ्या घरातल्या लोकांना माझ्या
कपाटात नेहमी रद्दी कशी काय दिसते,देव जाणे ! स्वभावाला औषध नाही हेच खर
......(अगदी खर आहे .....) चला, आता लवकरच मला पुन्हा माझ साफ कपाट, साफ
करायला लागणार असं दिसतंय. कारण पुन्हा रद्दीचा लकडा सुरु झाला आहे माझ्या माग!!!!!!! (J )