मी टी.व्ही. वर 'मास्टरशेफ' नावाचा एक कुकरी शो आवडीने पहायचे. या कार्यक्रमात देशातल्या सर्वसामान्य जनतेतून व्यावसायिक शेफ होण्याची ताकत असणारा स्पर्धक शोधला जातो. देशभरातून आलेले वेगवेगळ्या वयाचे स्पर्धक आणि दर आठवड्याला त्यांच्यामध्ये होणाऱ्या स्पर्धात्मक फेऱ्या असे काहीसे त्याचे स्वरूप आहे.
एका आठवड्यात एक अनोखी स्पर्धेची फेरी होती. सर्व स्पर्धकांना वेगवेगळे पदार्थ बनवण्यास सांगितले गेले होते आणि ते सारे पदार्थ चाखून त्यांना गुण देणार होते , सारऱ्या स्पर्धकांचे कुटुंबीय. आता खरे तर ही फेरी सगळ्यात सोपी ठरली असती कारण प्रत्येक कुटुंब आपल्या स्पर्धकाने बनवलेल्या पदार्थालाच जास्त गुण देणार...साहजिकच आहे! परंतु, इथेच तर खरी गंमत होती. कारण, त्यापैकी कोणालाच माहित नव्हते की कोणता पदार्थ कोणत्या स्पर्धकाने बनवला आहे ते. त्यांना सारे पदार्थ चाखायचे होते आणि चवीवरून ओळखायचे होते की कोणता पदार्थ कोणी बनवला असेल....... 'कसे शक्य आहे?' माझ्या तोंडून आपसूक आले. मला खूपच कठीण वाटली ती गोष्ट!
मी बराच विचार केला पण, मला उत्तर काही सापडले नाही. मग मी एक प्रयोग करायचा ठरवला. एकच पदार्थ विविध ठिकाणी चाखायचा आणि त्यांच्या चवीत काय वेगळेपणा आहे हे शोधून काढायचे. या नादाने मी काहीच दिवसात बरेच आणि बऱ्याच ठिकाणाचे पदार्थ खाऊन पहिले. त्याचा निकाल असा लागला की माझे पैशांचे पाकीट झाले हलके आणि जमिनीवरचा माझा भार मात्र काही किलोंनी वाढला. परंतु, एक गोष्टही लक्षात आली की पदार्थ जरी एकच असला तरीही तो बनवणाऱ्याची वेगळी अशी छाप सोडतोच आपल्या चवीमध्ये. तरीही केवळ चवीवरून तो कोणी बनवला असेल हे मी ओळखू शकेन असे मात्र मला काही वाटले नाही. चवीचे ते कोडे तसेच कित्येक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले आणि एक दिवस अचानक पूर्वजांच्या खाद्य संकल्पनेविषयी ऐकताना मला माझे उत्तर मिळाले....
पूर्वीच्या काळी म्हणे लोक बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे निषिद्ध मानत असत. त्यामागे त्यांची धारणा अशी होती की ; कोणताही पदार्थ जेव्हा बनवला जातो त्यावेळी तो बनवणाऱ्याच्या मनात जो काही भाव उत्त्पन्न झाला असेल तोच भाव त्या पदार्थातही उतरतो आणि मग तसाच भाव तो पदार्थ खाणारयाच्या मनातही उत्त्पन्न होतो. माहित नाही बाहेरचे पदार्थ कोण कोणत्या भावनेने बनवत असेल. कदाचित रागाने, कदाचित द्वेषाने ....आपली वृत्ती तशी होऊ नये म्हणून म्हणे पूर्वीचे लोक बाहेरचे खाणे टाळत असत . मी जेव्हा हे ऐकले , हसलेच होते पहिल्यांदा. पण, आता जेव्हा नवीन संदर्भातून याचा विचार करते तेव्हा वाटते ; कदाचित पूर्ण नाही पण काही अंशी तरी यात तथ्थ्य असावं . त्यशिवाय असे कसे घडत असेल बरे? हाडा-मांसाचे सगळ्यांचे सारखेच हात ....एकच पदार्थ बनवतात पण,प्रत्येकाने बनवलेल्या पदार्थाची चव मात्र निराळी. काय वेगळेपणा असेल निरनिरळ्या बोटांमध्ये जो त्यांनी बनवलेल्या पदार्थाला स्वतःची अशी निराळी चव देवून जात असेल??काही केले तरी हा प्रश्न माझी पाठ सोडत नव्हता कित्येक दिवस....
मी कधी त्याला तसे विचारले नाही आणि एका अर्थी बरेच झाले नाही विचारले ते कारण यावेळी तो सवांद ऐकून मला माझा 'युरेका' क्षण सापडला....त्याचे नेहमीचे उत्तर ऐकताना मी ..माझे प्रश्न, जुन्या धारणा या सगळ्याचा पुन्हा एकत्रित विचार केला आणि मला उमजले. जे सारे प्रश्न माझ्या मनात इतके दिवस घोळत होते ते सुटले. माझ्या भावाच्या आवडीच रहस्यही उलगडलं आणि चवीचही... !
माझा भाऊ ठराविक कोणत्या पदार्थासाठी नाही तर घरच्या चवीसाठी आसुसलेला आहे. आमटीमधील चिंच-गुळासारख्या आजीच्या आंबट-गोड मायेसाठी आसुसलेला आहे. काट्या चमच्याने सराईतपणे जेवताना आमटी ओरपण्याच्या साधेपणासाठी आसुसलेला आहे . तेव्हा मात्र एक गोष्ट मनाशी पक्की झाली. पदार्थ कोणताही असो ;दिसायला कितीही सुंदर असो, कोणत्याही साधनांनी बनवलेला असो परंतु त्याची चव सर्वस्वी अवलंबून असते ते ...तो कोणी आणि किती प्रेमाने बनवला आहे यावर . आईने प्रेमाने बनवलेल्या साध्या पोळी-भाजीची चव ५स्टार मधील शेफच्या कोणत्याही प्रसिद्ध पदार्थाला कशी येऊ शकेल? तो आपले सगळे कसब पणाला लावून अतिशय चविष्ट पदार्थ बनवू शकेल पण त्यात नेहमीच एक कमी राहील.....त्यात एका आईचे आपल्या मुलासाठीचे प्रेम नाही उतरू शकणार. आईच्या हातच्या पोळी-भाजी समोर जगातला कोणताही पदार्थ फिकाच पडणार.
मास्टरशेफ बघताना पडलेल्या माझ्या कठीण प्रश्नाचे सोपे उत्तरही आता सापडले होते. त्यावेळी त्या मुलीने , एका पतीने किंवा त्या आईने फक्त त्या पदार्थाची चव ओळखली नव्हती तर तो पदार्थ बनवताना मिसळलेले प्रेम ओळखले होते आणि म्हणूनच इतक्या सारया पदार्थांतून आपल्या माणसाने बनवलेला पदार्थ त्यांनी अचूक ओळखला होता. रस्त्यावर कितीही गर्दी असुदे पण त्यातून आपले माणूस लगेच ओळखतोच की आपण , तसेच काहीसे...!
आज जेव्हा हे चवीचे कोडे उलगडले आहे तेव्हा मी पूर्वी केलेल्या माझ्या खाण्याच्या प्रयोगाचा पुन्हा एकदा नव्याने विचार केला आणि वाटले.....ते सारे पदार्थ आज मी पुन्हा चाखले तर कदाचित कोणता पदार्थ कोणत्या ठिकाणचा आहे हे आजही मी नाही ओळखू शकणार परंतु, जर माझ्या घरी बनलेला पदार्थ त्यामध्ये ठेवला तर तो मात्र मी अचूक ओळखू शकेन. बाहेरच्या पदार्थांनी माझी भूक भागेल , जीभही खूष होईल पण माझ्या घरच्या पदार्थाने केवळ पोटच नाही तर मनही तृप्त होईल. कदाचित म्हणून जेव्हा कोणी मुलगी लग्न करून आपल्या सासरी जात असते तेव्हा तिची आई तिला कानमंत्र देते , " मुली लक्षात ठेव..घरच्यांच्या हृदयात शिरण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो". त्याचा अर्थ तू त्यांना रोज चांगले-चुंगले खायला करून घाल असा नसावा. तर, तू जे काही बनवशील ते इतक्या मायेने ,प्रेमाने बनवत जा की ती माया त्या जेवणातून आपोआप त्यांच्या मनात उतरेल आणि ते सहजच तुला आपलेसे करून घेतील असाच असेल..नाही का ?
रेंगाळणाऱ्या घरच्या मऊसूत पुरणपोळीची चव दुर्मिळ होत चालली आहे. आजकाल आमटी तर मीही छान बनवते पण तिला माझ्या आजीच्या हातासारखी चव मात्र नाही येत. कारण कदाचित स्वयंपाक करण्याचा आपला दृष्टीकोनच बदलला आहे हल्ली! स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात आता स्वयंपाक करणे आणि खाऊ घालणे ही आनंदाने आणि मायेने करायची कृती नाही तर , केवळ एक गरज बनून राहिली आहे.स्वयंपाक करताना "आयोडीनयुक्त नमक" तरी आठवणीने घालतो आपण पण गडबडीत वरून थोडे प्रेम शिंपडायला विसरतो.
बहुतेक पोटासाठी धावता धावता आपण पूर्वीच्या लोकांचा तो साधेपणा, दुसऱ्याला जेवण करून आग्रहाने खाऊ घालण्याचा आनंद, त्यांची तृप्तीची ढेकर ऐकून होणारे समाधान हे सारे हळू हळू इतिहासजमा करत चाललो आहोत . आणखी काही वर्षांनी कदाचित रोज घरी स्वयंपाक करायची गरज देखील उरणार नाही. मग बोटे चाटून ताट फस्त करायची ती पूर्वीसारखी स्पर्धा उरणार नाही. सगळ्यांना खूप आवडलेला पदार्थ शिल्लक नाही म्हणून आपल्या वाटणीचा आपल्या ताटातील घास देणारी आई कदाचित दिसणार नाही. पुढच्या पिढ्यांना विकतचे कितीतरी चविष्ट पदार्थ चाखायला तर मिळतील पण त्या साऱ्या खाऊ-गर्दीतून आपल्या घरातला साधा , आपल्या माणसाने प्रेमाने बनवलेला पदार्थ अचूक वेगळा नाही ओळखता येणार. त्या सारया पदार्थांमध्ये विविध मसाले असतील तरीही तो फिका असेल कारण त्यात असणार नाही ती आपलेपणाची , मायेची चव...........