काही काही जाहिराती बघताक्षणीच आवडतात आणि मनात घर
करून जातात. असंच काहीसं झालं जेव्हा मी नुकतीच एका कॅमेऱ्याची जाहिरात
बघितली.....
आता फोटो काढणे किती सोपी गोष्ट झाली
आहे नं? पण, काही वर्षांपूर्वी जेव्हा अजून डिजिटल कॅमेरे आले नव्हते
किंबहुना कॅमेरा ही एक चैन होती..तेव्हाचे फोटो किती खास असायचे. जपून, काळजीने काढलेले , योग्य क्षण कैद करण्यासाठी!! असे जुने फोटो बघायची इच्छा झाली आणि मी
लगेच माळ्यावरची बॅग खाली काढली ज्यामध्ये सगळे जुने फोटो जपून ठेवले आहेत. एक एक फोटो
पाहताना कितीतरी आठवणी ताज्या झाल्या.प्रत्येक फोटो , त्यातला प्रसंग, त्यावेळी केलेली धमाल...हे सारे आठवताना मी 'एलीस इन वंडरलॅंड' सारखी भूतकाळाच्या दुनियेत शिरले. हल्ली तंत्रज्ञान हातात जादूची
कांडी घेवून उभे असताना हा सारा आनंद मी एकटीने कशाला साजरा करायला हवा?.....मी लगेच सारे फोटो दूर असलेल्या माझ्या भावा-बहिणींशी शेअर केले. ते
जुने फोटो पाहून, ते क्षण आठवून नव्याने काहीतरी
गवसल्याचा आनंद त्यांना झाला होता. सगळ्यांना हेच वाटत होते कि
आपण किती छान छान आनंदाचे , सुखाचे क्षण जगलो......! अशा बऱ्याच गोष्टी ज्या कदाचित खूप साध्या होत्या पण खूप आनंद देवून गेल्या. त्या साऱ्या आठवल्या. हे सारे फोटो म्हणजे आमच्यासाठी अनमोल ठेवा आहे. पुढे जर कधी आम्ही आयुष्यात दुःखी झालो, निराश झालो तर ते सारे क्षण आमच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवतील, जगण्याची नवी उमेद देतील...
किती साधे साधे प्रसंग होते ते. रंगपंचमीचे रंगाने माखलेले चेहरे, उन्हाळ्याच्या सुट्टीत पैज लावून खाल्लेले आंबे आणि एक तरी माझ्या
बहिणीचा रडताना काढलेला फोटो...तिला त्या वेळी गाय पहायची होती आणि ती दिसली नाही
म्हणून बाईसाहेबांनी भोकाड पसरले.. हे साधे क्षण आज किती अनोखे
वाटतात. मनात विचार येतो, जर तेव्हाच कळाले असते कि हे साधे साधे
वाटणारे क्षण आपल्या पुढच्या आयुष्यात इतके महत्वाचे ठरतील तर कदाचित आपण ते अजून
जाणीवपूर्वक जगलो असतो. प्रत्येक गोष्ट जास्त आनंदाने साजरी केली असती.
खरे तर आपले त्या गोष्टीतील माणसासारखे झाले आहे. एक मनुष्य एका काच कापायच्या कारखान्यात काम करत असतो. त्याला एकदा एक बातमी कळते. " एक अतिशय श्रीमंत मनुष्य काही कामानिमित्त त्या कारखान्यात आलेला होता. त्याच्या हातातील घड्याळाला मौल्यवान असे हिरे जडलेले होते आणि त्यातला एक कारखान्याच्या स्क्रॅप टाकायच्या जागेत पडला. त्याने तो हिरा शोधायचा खूप प्रयत्न केला पण त्या काचेच्या तुकड्यांच्या डोंगराएवढ्या ढिगातून एक हिरा हुडकणे म्हणजे अशक्यच. शेवटी कंटाळून तो निघून गेला." झालं! हि बातमी म्हणजे त्या गरिबीने पिचलेल्या माणसाला अल्लाउद्दिनचा जादुई दिवा मिळाल्यासारखी वाटली. त्याने ठरवलं. आता काही झालं तरी तो हिरा शोधून काढायचाच! तहान-भूक विसरून तो कामाला लागला. प्रत्येक काचेचा तुकडा तो घ्यायचा, निरखायचा आणि मागे न बघताच टाकून द्यायचा. कित्येक दिवस त्याचा हाच क्रम चालू होता. समोरचा ढीग कमी होत होता आणि मागचा वाढत होता. शेवटी म्हणतात ना, 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'. एके दिवशी त्याला तो हिरा सापडला. पण, आता परिस्थिती अशी झाली होती कि, इतके दिवस सतत एकच काम करून करून त्याला सवय झाली होती. त्यामुळे हिरा मिळाल्यावर त्याने तो उचलला, बघितला आणि सवयीप्रमाणे मागे फेकून दिला.......नंतर जेव्हा त्याला याची जाणीव झाली तेव्हा त्याने मागे वळून बघितले तर काय? काचेच्या तुकड्यांचा डोंगराएवढा ढीग आणि त्यात तो हिरा कुठे पडला काहीच माहित नाही. म्हणजे आता त्या शोधमोहिमेचा पुन्हा श्रीगणेशा करावा लागणार. इतक्या दिवसांच्या कष्टाने आणि निराशेने तो इतका थकून गेला होता कि पुन्हा सारा ढीग नव्याने उपसण्याची त्याची इच्छाच उरली नव्हती. अखेर हार मानून आपल्या नशिबाला दोष देत तो निघून गेला.
आपलेही काहीसे असेच आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात हिऱ्यासारख्या मौल्यवान क्षणांची वाट पाहत असतो आणि ते शोधता शोधता हाताला लागणारे खरे अनमोल क्षण काचेचे तुकडे म्हणून फेकून देत असतो. शेवटी जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा लक्षात येते कि, 'अरे, आपण काच म्हणून फेकून दिलेले तुकडेच खरे हिरे होते.' तेव्हा मात्र हळहळण्याखेरीज आपण दुसरे काही करू शकत नाही.
आपण ठरवतो येणाऱ्या वाढदिवसाला काय काय करायचं, सहलीला गेल्यावर तिथे कशी धमाल करायची... तेव्हा भरपूर आनंद लुटायचा!! पण, त्या गोष्टी केल्यावर आनंदी होऊ असे ठरवताना रोज मिळणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आनंदी होणे मात्र आपण विसरूनच जातो...काय माहित उद्या कदाचित असा काही प्रसंग घडेल ज्यामुळे आपण आपला वाढदिवस साजरा करू शकणार नाही किंवा सहलीला जाऊ शकणार नाही. मग आपण पुढच्या वर्षी येणाऱ्या वाढदिवसाची किंवा दुसऱ्या सहलीला जायची वाट बघत बसणार आनंदी होण्यासाठी? नाही ना! भविष्यात येणाऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी आनंदी व्हायचे असे ठरवून वाट बघत बसण्यापेक्षा आपण रोज घडणाऱ्या लहान लहान गोष्टी जास्त आनंदाने साजऱ्या करूयात. म्हणजे जशी 'खुशियोंकि इंस्टौलमेंट ' म्हणा ना! सगळ्यांनी मिळून केलेली एखाद्या मित्राची फजिती, पावसात भिजून आल्यावर टपरीवर घेतलेला गरम गरम चहा आणि भजी, घरातल्या सगळ्यांसोबत बघितलेला एखादा सिनेमा,भावाची-बहिणीची केलेली थट्टा, विनाकारण केलेले भांडण........असे कितीतरी क्षण पूर्णपणे जगूया! मग जेव्हा आपण मागे वळून पाहू तेव्हा न ओळखता आलेले हिरे पाहून हळहळण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.............
हे सारे प्रसंग कॅमेऱ्यात कैद करून नाही ठेवता येणार आपल्याला कदाचित; परंतु ,निसर्गाने एक अद्भुत कॅमेरा दिलाय ना आपल्याला. स्मृतींचा!!! तो कॅमेरा वापरू, मन फोकस करू, आनंद झूम करू आणि म्हणू या सगळ्या आनंदी क्षणांना
पुढे काही वर्षांनी जेव्हा आपण एखाद्या आराम खुर्चीवर रेलून , धूसर डोळ्यांनी भूतकाळातल्या कप्प्यात काही शोधायचा प्रयत्न करू तेव्हा क्लिक केलेला हा अल्बम आपल्या हाती लागेल. प्रत्येक फोटो आपल्याला पुन्हा त्या जादुई सफरीवर घेऊन जाईल. अलगद......तेव्हा कुठलीच खंत नसेल........कुठलीच बोच नसेल....सोबत साथीला असेल फक्त समाधान.......हे सारे क्षण पुरेपूर उपभोगल्याचे!!!!!!